मुंबई : एकीकडे निसर्ग वादळांनं थैमान घातलेलं असताना ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मुख्य सचिव अजोय मेहताविरोधात एक अंतर्गत वादळ निर्माण झालंय. मेहता हटाव असा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून नारा देण्यात आलाय. त्यामुळे मेहतांवर ठाकरे मेहरबान असले तरी मेहता यांना आता जावंच लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे मेहतांनंतर कोण येणार याची चर्चा जास्त रंगू लागलीय.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोण? अजोय मेहतांची पुन्हा वर्णी लागणार? सिताराम कुंटे किंवा संजय कुमार यांना संधी मिळणार? महाविकास आघाडीमध्ये सध्या ही जोरदार चर्चा सुरु झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडून मेहतांच्या बाजूने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा तसा कौल नाहीय. त्यामुळे सध्या मेहतांना बाजूला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढलाय. मागच्या कॅबिनेटमध्ये सचिव विरुद्ध मंत्री राडाही पाहायला मिळाला. याचनिमित्तानं मेहता हटाव हा नारा देण्यात आला. पण अजोय मेहतांना बाजूला केले तर दुसरं कुणाला आणायचं? यावर लॉबिंग सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधीच तिसर्यांदा अजोय मेहतांचा कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजोय मेहता यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता तिसरी टर्म पदरात पाडून घेतील, असे संकेत आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांच्या विरोधात मोर्चेबांधणी केलीय आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला. छगन भुजबळांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेता सादर केल्यानं खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे अजोय मेहतांच्या विरोधातलं वातावरण तयार झालंय.
अजोय मेहतांनंतर पहिलं नाव अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार याचं आहे. संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील दीर्घ अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्यानं ते प्रतिक्षेत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांना संधी मिळू शकते.
मराठी विरुद्ध अमराठी हा वाद अधिकाऱ्यांमध्ये असतो. त्यामुळे अमराठी अधिकारी निवडायचा झाला तर नंबर लागतो. सिताराम कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 1 मे 2012 ते 28 एप्रिल 2015 पर्यंत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदा सोबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमचा सीताराम कुटेंना चांगलाच अनुभव आहे.
त्यासोबत अर्थ, हाउसिंग, प्लॅनिंग विभागाची त्याच्या पाठिशी दांडगा अनुभव आहे. त्यात शांत स्वभाव, मोजकेच बोलणं आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध ही कुंटेंची जमेची बाजू आहे. त्यानंतर तिसरं नाव प्रविण परदेशी यांचं येतं. प्रविण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 13 मे 2019 ला मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. एका वर्षाच्या आत उचलबांगडी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रधान सचिव आणि नंतर अपर मुख्य सचिवपदी बढती झाली. पण सध्या कोरोनाच्या काळात प्रविण परदेशींच्या कामागिरीवर नाखूश होऊन ठाकरे सरकारनं त्यानं मुंबई पालिका आयुक्त पदावर हटवलं. त्यामुळे परदेशींची शक्यता धुसरच दिसतेय. निर्णय कोणताही असो यामध्ये शरद पवारांचा सल्ला महत्वाचा असणार आहे. त्यामुळे जो कोणीही अधिकारी नेमला जाईल, त्याचं पवार कनेक्शनही तितकच महत्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी पवार फॅक्टर याही वेळेला दिसेल अशीच चर्चा आहे.