मुंबई: ड्युटीवरून घरी जाताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर काळाने घाला घातला. गाडीवरून जाताना पतंगाचा मांजा गळ्याला लागल्याने गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचे (Mumbai Police) नाव असून त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेश जाधव हे दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून ते ड्युटी संपल्यानंतर घरी निघाले. वरळी येथे त्यांचे निवासस्थान आहे. सांताक्रूजमधील वाकोला ब्रिज या ठिकाणी आल्यानंतर मांजाने त्यांचा गळा चिरला. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
दिंडोशी पोलीस स्थानकाकडून यासंबंधित एक निवदेन जारी करण्यात आलं आहे.
काय म्हटलंय निवेदनात?
आज रोजी दिंडोशी पोलिस स्टेशन चे पोलिस शिपाई क्र 111615/ समीर सुरेश जाधव वय 37 वर्षे रा ठी. बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम न 28, वरळी मुंबई हे 15.30 वाजताचे सुमारास त्यांचे मोटार सायकल वरून कर्तव्य पूर्ण करून त्यांचे वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज , सांताक्रुज पुर्व मुंबई याठिकाणी मांजाने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल 1 यांनी उपचार कामी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.
सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशन चे व पो नी राजेंद्र मुळीक यांनी 18.06 वाजता मोबाईल द्वारे कळविले आहे. सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस पथक हजर असून त्यांचे नातेवाईकांना कळविण्यात आलेले आहे तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे.
मांजामुळे आतापर्यंत अनेक बळी
नायलॉनच्या मांजामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो, तसेच पक्षांच्या जीवासाठीही ते अत्यंत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नायलॉनच्या मांजावर बंदी आणावी यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. विशेषतः दुचाकी स्वारांचा या मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
हायकोर्टाने नायलॉनच्या मांजावर बंदी आणण्याचे निर्देश या आधीच दिले आहेत. प्रशासनाकडून नायलॉन बंदीच्या नावावर फक्त कागदी कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजा बंदीसाठी नायलॉन मांजा निर्मिती करणारे, विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यावर करणार्या कडक 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच वारंवार असे कृत्य करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: