Navneet Rana : आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना खार येथील बेकायदेशीर बांधकामा प्रकरणी कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. खार येथील फ्लॅटमध्ये राणा दाम्पत्याने बेकायदेशीर बांधकाम केले असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यानंतर महापालिकेने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. दिंडोशी कोर्टाने मु्ंबई महापालिकेलादेखील आदेश बजावले आहेत. 


मुंबईतील गोरेगाव येथील दिंडोशी कोर्टाने आज राणा दाम्पत्याने पालिकेच्या नोटीसविरोधात दाखल केलेली याचिका निकाली काढली. यावेळी कोर्टाने खार निवासस्थानातील बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे रितसर दाद मागण्याचे निर्देश राणा दाम्पत्याला दिले. मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्यावा असे निर्देशही दिले आहेत. मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय राणांच्या विरोधात गेल्यास त्यावर दोन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने  पालिकेला दिले आहेत. या कालावधीत राणा दाम्पत्याला कोर्टात कायदेशीर आव्हान देता येऊ शकेल असेही कोर्टाने म्हटले. 


खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या पथकाने 4 मे रोजी रवी राणा यांच्या खारमधील घराची पाहणी केली होती. 


राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात त्यांचे निवासस्थान असलेले मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार  असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये संघर्षाची स्थिती झाली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. या दरम्यानच मुंबई महापालिकेने अवैध बांधकामाप्रकरणी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: