जळगाव : कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती 20 वर्षांची होती. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात कामाला होती.


काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. मृत्यूनंतर ही हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने त्यामुळेच तिला रेल्वेचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, स्नेहल उजेनकर या तरुणीचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


या घटने संदर्भात मयत स्नेहल उजेनकरच्या परिवारकडून माहिती घेतली असता तिच्या आईने म्हटलं की, "स्नेहल ही रोज सकाळी नऊ वाजता घरातून कामावर जात असे आणि रात्री आठच्या सुमारास घरी येते. गेल्या काही महिन्यांपासून तिचे नवऱ्यासोबत वाद होत असत. काल (24 मे) जेव्हा ही घटना घडली त्यावेळी ती तिच्या नवऱ्यासोबतच बोलत होती. त्यांच्यामधील वादात आलेल्या मानसिक तणावात तिला रेल्वे आल्याचं लक्षात आलं नसावं. ती नेहमी हेडफोन वापरत असली तरी ती एकाच कानात वापरत होती. त्यामुळे हेडफोनमुळे घटना झाल्यापेक्षा पतीच्या वादात आलेल्या तणावात हे घडलं असल्याचा अंदाज आहे."


वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांकडून रेल्वे रुळाचा वापर 
रेल्वे प्रशासनातर्फे फूट ओव्हर ब्रिज विविध ठिकाणी बांधण्यात आले आहेत मात्र तरीही अनेकदा नागरिक या फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता वेळ वाचवण्यासाठी थेट रुळ ओलांडून पलिकडे पोहोचतात. पण याच दरम्यान अपघात होतो आणि प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे स्थानकात उद्घोषणेमार्फक वारंवार केलं जातं. शिवाय रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृती सुद्धा करण्यात येते. मात्र, तरीही प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडतात आणि काही वेळा ते जीवावर बेततं. अशा घटनांमुळे रेल्वे अपघातांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे नागरिकांनी, प्रवाशांनी स्वत:च्या जीवाची काळजी घेत रेल्वे रुळ ओलांडू नये असं आवाहन वारंवार केलं जातं.