मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे, आपण केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही, असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी दानवेंची हकालपट्टी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
मीच मुख्यमंत्रिपदी राहणार
दिल्लीतून बोलावणं येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पालकमंत्र्यांना ध्वजावंदनापासून रोखणारे देशद्रोही
शेतकऱ्यांची आंदोलनं आणि सुकाणू समितीवरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू न देणारेही देशद्रोहीच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता गेली तरी चालेल, पण आम्हाला ज्या व्यक्ती देशाचा झेंडा फडकवण्यापासून रोखेल. त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
संपूर्ण कर्जमाफी मागून अराजकता
संपूर्ण कर्जमाफी मागणं हे अराजकता निर्माण करण्यासारखं असल्याचंही फडणवीस म्हणाले. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ऑनलाईन फॉर्म असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकीयदृष्ट्या भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपने विचाराशी बांधिलकी असलेली कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली असल्याचंही ते म्हणाले. भारत महासत्ता होऊ शकतो, ही आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केल्याचंही फडणवीस म्हणाले.
राज्यभरात काढलेल्या मराठा मोर्चांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. 'एकूण 58 मोर्चे झाले. काही जणांनी त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, पण या मोर्चांनी ते होऊ दिलं नाही.' असं फडणवीस म्हणाले.
रवी भुसारींच्या निर्णयाने दुःख, पण...
रवी भुसारींचा अचानक फोन आला. 60 वर्षांचा झाल्यामुळे पक्षाचं काम थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राजकीय क्षेत्रात काम करत असताना रवीजी अशा पदावर होते की त्यांच्याबद्दल फार आदर होता. असं असताना हा निर्णय घेणं, फार जिकिरीचं काम आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आपल्याला दुःख झालं असलं, तरी एक प्रचारक म्हणून एका प्रचारकाबाबत आदर आहे, असंही फडणवीस म्हणाले.