मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाडसत्र मोहीम सुरुच असून पोलिसांकडून दररोज वाहनांच्या तपासणीदरम्यान रोकड किंवा मौल्यवान वस्तू जप्त केल्या जात आहेत. रविवारी भिवंडीमध्ये चांदीच्या विटा नेणाऱ्या व्हॅनला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं होतं, तर काही ठिकाणी एटीएम व्हॅनची तपासणी करताना रकमेत अनियमितता आल्याने ती रोकड जप्त केली होती. आता, पुन्हा एकदा भरारी पथकाने मोठी कारवाई केली असून मुंबईतून सोनं (Gold) जप्त करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून गोल्डच्या अनुषंगाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या सोन्याच्या बांगड्यांची तपासणी केली जात आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या गोल्ड चा वापर होणार होता का, यासंदर्भात अधिक तपास निवडणूक आयोगाची टीम करत आहेत. भरारी पथकाला सापडलेल्या या गोल्डची किंमत 1 कोटी 43 लाख रुपये एवढी असून सोन्याच्या बांगड्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दहिसर पश्चिममधील अवधूत नगर परिसरातून स्थिर सर्वेक्षण पथकाने ही कारवाई केली असून 1.43 कोटी किमतीचे तब्बल 1 किलो 950 ग्रॅम सोने जप्त केले आहे. दरम्यान, रविवारी कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकास वाहन तपासणी दरम्यान एका एटीएम व्हॅनमध्ये एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. या व्हॅनमध्ये एकूण रक्कम 1 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती होती. मात्र, या रक्कमेमध्ये तफावत आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे. व्हॅनमध्ये असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने व्हॅनची चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर, येथील रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे, सर्व रक्कम आयकर विभागाकडे पाठवण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात पोलिसांकडून (Police) झाडाझडती सुरू असून गेल्या महिनाभरात तब्बल 280 कोटींपेक्षा जास्त रुपयांची रोकड पोलिसांकडून व भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखा जवळ येत असतानाच भरारी पथकेही चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यानुसार, अनेक ठिकाणी रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या जात आहेत. रविवारी विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पोलिसांकडून तब्बल 6500 किलो चांदी जप्त करण्यात आली होती. पण, ती अधिकृत असल्याचे तपासातून पुढे आले.