मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने एका युवकाचे प्राण वाचवले आहेत. नौकरी गेल्याच्या नैराश्यातून हा तरूण आत्महत्या करत होता. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती. 
  
सायबर शाखेच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितले की, "कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे 30 वर्षीय युवकाची नौकरी गेली होती. शिवाय त्याच्यावर 37 हजार रूपये कर्ज होते. त्यामुळे नैराश्यातून या तरूणाने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्याने सुसाइड नोट लिहिली आणि ती नोट ट्विट केली. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने हे ट्विट पाहिले आणि सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सायबर पोलिसांनी तत्काळ ट्विटरच्या माध्यमातून त्या युवकाचा पत्ता शोधून काढला आणि त्याचा फोन नंबरही मिळवला."


"पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो तरूण विरारमधील चंदनसार परिसरातील राहणारा होता. त्याचा मोबाईल नंबरही पोलिसांना मिळाला. त्यामुळे आमच्या एका टीमने त्याला फोनवरून समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या टीमने विरार पोलिसांना संपर्क करून त्याचा पत्ता दिला. सायबर पोलिसांची टीम त्याला समजावत असतानाच विरार पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. या सर्व घटनेनंतर सायबर पोलिसांनी त्याचे समुपदेषन केले, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली.    


रश्मी करंदीकर म्हणाल्या, आत्महत्या करण्यापासून वाचविल्यानंतर या तरूणासोबत चर्चा केल्यानंतर त्याने सांगितले की, मी अंधेरीतील एका कंपनीत काम करत होतो. घर भाडे आणि इतर खर्चासाठी त्याने कंपनीच्या खात्यातून 37 हजार रूपये काढले होते. त्यानंतर कंपनीने आॅक्टोंबर महिन्याच्या पगारासह त्याचे इतर इंसेंटिव थांबवले. त्याबदल्यात कंपनीला चेक दिला आहे आणि आता कंपनी हा चेक डिपॉझिट करणार आहेत. असे झाले तर चेक बाऊंस होईल आणि कंपनीवाले माझ्याविरोधात गुन्हा दाखल करतील. त्यानंतर मला तूरूंगात जावे लागेल. मला नौकरी मिळाली तर मी त्यांचे सर्व पैसे परत करेन. परंतु, कंपनीने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे मला नौकरी मिळत नाही. त्यामुळे आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. "   


रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, या वर्षात आम्ही जवळपास 29 लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्यांचे प्राण वाचवले आहेत. हे सर्व जण विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होते.


महत्वाच्या बातम्या