NCB Questioning Ananya Pandey : क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी गुरुवारी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकत, सर्चऑपरेशन केलं. त्यानंतर एनसीबीनं अनन्या पांडेला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल अनन्या एनसीबी कार्यालयात वडिल चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीसाठी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली होती. जवळपास दोन तासांपर्यंत अनन्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याबाबत अनन्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे आज पुन्हा अनन्याला एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. 


सध्या बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच काल (गुरुवारी) शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यन खानची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं होतं. जवळपास दोन तास अनन्याची चौकशी करण्यात आली होती. 


काल (गुरुवारी) शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलं होतं. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.  


शाहरुखच्या मन्नतवर एनसीबीचं पथक 


मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. काल (गुरुवारी) एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं. परंतु, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीनं सर्च वॉरंटसह मन्नतवर धडक दिली असून शाहरुखच्या घरी एनसीबीकडून काही वेळासाठी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. 


आर्थर रोड तुरुंगात शाहरुख-आर्यनची 10 मिनिटं भेट 


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. त्यानंतर काल (गुरुवारी) आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. शाहरुखनं दहा मिनिटं आर्यनशी संवाद केला. जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.