Sapna Gill-Prithvi Shaw: पृथ्वी शॉसोबतच्या (Prithvi Shaw) वादानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सपना गिलला (Sapna Gill) सोमवारी (20 फेब्रुवारी) मुंबईतील स्थानिक न्यायालयातून जामीन मिळाला. सपनासह अन्य दोन आरोपींनाही न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. सपना गिलसह आठ जणांवर पृथ्वी शॉसोबत गैरवर्तन करणं, त्याच्या कारवर हल्ला करणं आणि प्रकरण दाबण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.


सपना गिलला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन 


या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी आठ आरोपींना कोठडीत ठेवलं होतं. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना 20 फेब्रुवारीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर सर्व 8 आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, या निर्णयानंतर लगेचच अंधेरी न्यायालयात सपना गिलबाबत जामीन अर्ज दाखल करण्यात आला. अखेर न्यायालयानं सपना गिलला 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सुरक्षा रक्कम उद्या (20 फेब्रुवारी) पर्यंत जमा करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते. 


पोलिसांनी सोशल मीडिया इंफ्लुएंसर सपना गिल, तिचा मित्र शोभित ठाकूर आणि इतर सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 143, 148, 384 (खंडणी) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दंगल आणि खंडणीच्या मूळ आरोपांव्यतिरिक्त, पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 387 देखील जोडले होते. 


सपना गिलनंही दाखल केलेली तक्रार


सपना गिलचे वकील काशिफ अली खान यांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपींना त्रास देण्यासाठी हे अतिरिक्त कलम उशिरानं जोडण्यात आलं आहे. तसेच, कथित गुन्ह्यात वापरलेली बेसबॉल बॅट आणि वाहन जप्त करण्याची गरज असल्याचं सांगत पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं पोलिसांची मागणी फेटाळून लावत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आता सपनालाही जामीन मिळाला आहे. सपना गिलने कलम 154, 326ए, 326बी, 354, 354बी, 370, 370ए, 376डीबी, 376ई, 509 अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


सेल्फी घेण्यावरुन सुरू झालेलं प्रकरण... 


पृथ्वी शॉ मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे असताना सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यासोबत सेल्फी काढण्यावरून हा वाद झाला. पृथ्वी शॉ याने चौथ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल येथे असताना सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट केला. दोघांनी सेल्फीही घेतला, मात्र चौथ्यांदा सेल्फी घेण्यासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. परंतु पृथ्वीने नकार दिला. यावेळी सपना आणि तिच्या मित्राने पृथ्वी शॉचा टीशर्ट धरला आणि त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पृथ्वी शॉ संतापला. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत सपना आणि शोबितपासून पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राला दूर नेलं. हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या सपना आणि शोबित याला हॉटेलबाहेर काढले. याचाच राग आल्यानं दोघांनीही पृथ्वी शॉचा बदला घ्यायचं ठरवलं होतं. 


सपना आणि शोबित हे हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ बाहेर पडण्याची वाट पाहत थांबून राहिले होते, जवळपास 25 मिनिटं वाट पाहिल्यानंतर पृथ्वी शॉची गाडी जशी हॉटेलबाहेर निघाली तसा या दोघांनी त्यांच्या साथीदारांसह त्याचा पाठलाग केला. या दोघांनी विले पार्लेपासून ओशिवरा असा जवळपास 10 किलोमीटर पृथ्वी शॉचा पाठलाग केला होता. पोलीस तपासादरम्यान पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे सपना गिल आणि तिच्या साथीदारांविरोधात आणखी काही कलमं लावली होती. या व्हिडीओमध्ये सपना गिल ही शोबित ठाकूर आणि अन्य साथीदारांना हल्ल्यासाठी बॅट, चाकू आणि अन्य हत्यारे आणण्यास सांगत असल्याचं ऐकू येत असून त्याआधारे पोलिसांनी आरोपींविरोधात नवी कलमे लावली होती. अखेर याप्रकरणी सपना गिलला जामीन मंजूर करण्यात आला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण