मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे चांगलेच सक्रिय झाले असून ते मंगळवारी प्रभादेवी, दादर शाखेला भेट देणार आहेत. 'सामना'च्या दारात असलेल्या शिवसेना शाखेला श्रीकांत शिंदे भेट देणार असून त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षाला धार येणार असल्याचं चित्र आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केलं आहे. त्या माध्यमातून मुंबईतील विविध शाखांना ते भेट देत असून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. मंगळवारी ते 'सामना' मुखपत्राच्या दारात असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेला भेट देणार आहेत. त्यामुळे सामनाच्या दारातून ते थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील शिवसेना शाखांच्या भेटी वाढवल्या आहेत. त्या माध्यमातून शिवसैनिक आणि सामान्य लोकांसोबत संवाद साधत आहेत. या आधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत ठाण्यातून निवडणूक लढण्याची भाषा केली आहे. तसेच त्यांनी वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या मागे आहे हे एकदा पाहूयाच असं आव्हान दिलं आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता खासदार श्रीकांत शिंदे हे सक्रिय झाले असून त्यांनीही थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. त्यासाठी ते मंगळवारी प्रभादेवी, दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आमदार सदा सरवणकर यांचे कार्यालय हे सामना दैनिकाच्या दारासमोर आहे. त्या कार्यालयाला श्रीकांत शिंदे भेट देणार आहेत.
जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेना निवडणूक लढवणार
भाजपकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाला त्याचं नाव घ्या, भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत असे म्हणाले. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणची जागा शिवसेनाच लढवणार असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
एकीकडे पर्यावरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे 25 वर्षे महापालिका हातात असूनही घाण पाणी समुद्रात सोडायचं ही दुटप्पी भूमिका ठाकरेंची असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. मुंबई महापालिका हातात असताना यांनी काहीच केलं नाही, आता पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करतात असंही ते म्हणाले. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करणार असून उद्धव ठाकरे यांच्या गटाला खिंडार पडणार असं श्रीकांत शिंदे म्हणाले.