मुंबई: राजकीय नेत्यासह मंत्र्यांच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पैसे घेणाऱ्या एका रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या बदल्या मंत्रालयातून होणार असल्याची धक्कादायक बाब यात उघड झाली आहे. याप्रकरणी अंधेरीतून 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडील काही रक्कम आणि कागदपत्रही जप्त करण्यात आले आहेत.


रविंद्र सिंग ऊर्फ शर्मा, विद्यासागर हिरमुखे, किशोर माळी आणि विशाल ओंबळे अशी या चौघांची नावं आहेत. या 4 जणांना आता पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी हे 4 जण लाखो रूपयांचं कमिशन घ्यायचे अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर तातडीनं या चार जणांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अटक करण्याता आलेला आरोपी किशोर माळी हा सोलापूरचा असून त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे या रॅकेटचे नेमके सूत्रधार कोण? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.