मुंबई : सेटलमेंट करुन हुंड्याची तक्रार मागे घेणाऱ्या घटस्फोटित दाम्पत्यालाच मुंबई हायकोर्टाने दंड ठोठावला आहे. पतीला 20 हजार तर पत्नीला 10 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली होती. मात्र दोघांनी सेटलमेंट करुन हे प्रकरण निकाली काढलं. सेटलमेंटसारख्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये पोलिस आणि कोर्टाची मशिनरी वापरली जाते.

आतापर्यंत कोर्टाने पतीकडून दंड वसूल केला आहे. यावेळी मात्र कोर्टाने पतीसोबतच पत्नीलाही दंड सुनावला. मुंबईच्या वरळीतील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडला दंडाची रक्कम देण्यास कोर्टाने सांगितलं आहे.

पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर तिने आपल्याविरुद्ध आणि कुटुंबीयांविरुद्ध केलेल्या सर्व फौजदारी कारवाया मागे घेण्याचं आश्वासन दिलं, असं पतीने कोर्टात सांगितलं. 2013 मध्ये कांदिवली पोलिसात तरुणीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तरुणाविरोधात कलम 498अ अन्वये गुन्हा दाखल झाला.

2016 मध्ये तरुणीने वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. जून महिन्यात कोर्टाने त्यांना विवाह सल्लागाराकडे पाठवलं. हिंदू मॅरेज अॅक्टच्या 13ब नुसार दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.