कल्याण : सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. अनिल सानप असं हत्या झालेल्या इसमांचं नाव असून पोलिसांनी हत्या करणाऱ्याला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज परिसरात आज दुपारी ही घटना घडली. आरोपी संतोष बरदाडे आणि अनिल सानप हे ड्यूक्स हॉटेलच्या एका रूममध्ये भेटले होते. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि संतोषने अनिलवर कोयत्याने वार केले.
या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोपी संतोष हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिल याने आपल्याकडून सरकारी नोकरी लावण्यासाठी 35 लाख रुपये घेतले होते, मात्र नोकरीही लागली नाही आणि अनिल पैसेही परत करत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या संतोषनं हे टोकाचं पाऊल उचललं.
अनिलची हत्या आपणच केल्याची कबूली संतोष बरदाडे पोलिसांकडे दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.