मुंबई : कोरोना व्हायरससारख्या प्राणघातक व्हायरशी संपूर्ण देश लढा देत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत आहे. मुंबईतील वाढता प्रादुर्भाव रोखणं हे मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनासमोर आव्हान होतं. अशातच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेला कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शून्य रुपयांचा निधी देण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबई महापालिकेने ना केंद्र सरकारचं अर्थ सहाय्य मिळालं, नाही मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून कोणतीही मदत मिळाली. मुंबई मनपाच्या तिजोरीत कोविड-19 साठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनीही कोणतीही पुढाकार घेतला नाही.
माहिती अधिकारातून उघड झालेल्या बाबी :
कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेला फक्त 86 कोटी रुपये मिळाले आहेत. देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असूनही सरकार आणि देणगीदारांनी मुंबई मनपाला उघड मदत केली नाही. कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेला गेल्या 4 महिन्यांत अवघ्या 86 कोटींची मदत मिळाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिली आहे. या फंडाचा सर्वाधिक वाटा मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचा असून एकूण जमा रक्कमेपैकी जवळपास 84 टक्के रक्कम देण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कोविड-19 अन्वये मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या निधीची माहिती मागविली होती. मुंबई पालिकेच्या वित्त विभागाच्या मुख्य कार्यालयाने अनिल गलगली यांना मिळालेल्या विविध प्रकारच्या निधीची माहिती दिली. गेल्या 4 महिन्यांत मुंबई पालिकेला कोविड-19 साठी एकूण 86 कोटी 5 लाख 30 हजार 303 रुपये मिळाले आहेत.
मुंबई महापालिकेला कोविडचा सामना करण्यासाठी कुणी किती मदत केली?
- या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी 72.45 कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी 84 टक्के आहेत.
- त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी 11.45 कोटी जमा केले आहेत.
- वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ 50 लाख रुपये दिले आहेत.
- खासगी लोकांनी 35.32 लाख रूपयांची मदत केली असून
- आमदारांकडून केवळ 1.29 कोटी निधीमध्ये जमा झाले आहेत. यामध्ये केवळ 7 आमदारांचा समावेश आहे.
माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेला कोविडशी लढण्यासाठी ना केंद्र सरकारने मुंबई पालिकेला सहाय्य केले, ना मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त झाली नाही. मुंबई मनपाच्या तिजोरीत कोविड-19 साठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणतीही पुढाकार घेतलेला नसल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गुडन्यूज... मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी