ठाणे : कळवा येथे राहणाऱ्या एका अतिशय गरीब मुलाने दहावीत 76 टक्के मिळवून पालिका शाळेतून पहिला नंबर पटकावण्याचा मान मिळवला आहे. राहुल माने असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो.

घरात दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. अभ्यास करायला आजूबाजूला चांगलं वातावरण नाही. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करायला घरात कोणी नाही. तर काही ही अडलं असेल तर हक्काने सांगण्यासाठी वडील देखील नाहीत, अशा चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या मुलाची ही कहाणी. डोक्यावर इतकं ओझं असताना राहुलने जिद्द मात्र सोडली नाही. अभ्यास करून आपण आपली परिस्थिती बदलू शकतो याची जाणीव राहुलला लहान वयातच आली होती. म्हणूनच त्या जाणिवेतून निर्माण झालेल्या प्रगल्भतेमुळे राहुलने शाळेत पहिला नंबर पटकावला आहे.



राहुल एका पत्र्याच्या घरात सध्या राहतो. त्याची आई माकडाचे खेळ करून आणि प्रसंगी वेठबिगारी करून आपल्या दोन मुलांचं जेवण आणि शिक्षण भागवते. त्याचे वडील संसार उघड्यावर टाकून पळून गेले आहेत. त्यामुळे घराची जबाबदारी आता राहुल वरच येणार आहे. या आपल्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून राहुलने चिकाटीने अभ्यास केला. ज्या ठिकाणी राहतो तिथे प्रचंड गोंगाट असल्याने जवळच्या बुद्धविहारात जाऊन पाठांतर केले. इतकेच नाही तर आजूबाजूच्या लहान मुलांना शिकवण्याचं काम देखील तो याच वेळी करत होता. अशा प्रकारे अभ्यास करून आज त्याने उज्वल यश मिळवले आहे.

राहुलने अभ्यासाबरोबरच खेळायल देखील तितकाच वेळ दिला. दिवसात तीन तास तो खेळायचा, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याचे काम देखील तो यावेळी करायचा. त्यातून जो वेळ उरायचा त्यात त्याने अभ्यास केला.आता शिक्षक बनण्यासाठी जे शिक्षण घ्यावे लागेल ते सर्व घेण्याची तयारी दर्शवली आहे. आणि आयुष्यात मोठं होऊन त्याला एक उत्तम शिक्षक बनायचे आहे. त्यासाठी तो आता प्रयत्न करणार आहे. राहुलच्या आईने देखील त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात पूर्णतः मदत करणार असल्याचे सांगितले आहे.