मुंबई : शिवसेनेचे जवळपास अर्धा डझन नेते आतापर्यंत ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. एकमागोमाग एक नेत्यांच्या या चौकशीवरुन शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप वारंवार शिवसेनेकडून केला जात आहे. पण हिच शिवसेना आता थेट ईडीच्या विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. ईडीविरोधात आता आक्रमक व्हायचं असं एकमत शिवसेनेत झाल्याचं स्पष्ट होत आहे. ईडी, आयटीच्या एकामागोमाग एक धाडी शिवसेना नेत्यांवर पडत आहेत. राहुल कनाल आणि यशवंत जाधव यांच्यावर आयटीची धाड पडली होती तर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणली आहे.
शिवसेना काय भूमिका घेणार?
प्रताप सरनाईक, संजय राऊत, रविंद्र वायकर, भावना गवळी, आनंद अडसुळ अर्जुन खोतकर आणि पाटणकरांची ईडीकडून चौकशी आणि संपत्ती जप्तीची कारवाई झाली आहे त्यामुळे प्रत्येक नेत्यांसोबत कार्यकर्त्यांच्या मनातही प्रचंड रोष निर्माण झालाय. नेत्यांना सुरुवातीला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा नेते कार्यकर्त्यांची गर्दी न करता गेले होते पण आता ईडी आणि आयटीच्या धाडीमुळे पक्षानं ठाम भूमिका घ्यावी, असा हळूहळू दबावही सुरु झाला आहे लोकभावनेतून ईडी विरोधात आंदोलनं झाली पाहिजे असं मतं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरेंवरचा दबाव वाढला
आतापर्यॅत ज्या ज्या नेत्यांवर कारवाई झाली त्या त्या नेत्यांचा तसेच त्याच्या निकटवर्तीयांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर दबाव वाढत चालला आहे, केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी असं मत अनेक नेत्यांनी पक्षप्रमुखांकडे व्यक्त केलं आहे. रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवरही ईडीनं जप्ती केली आहे त्यामुळे भविष्यात ईडीच्या निशाण्यावर आणखी काही नेते येऊ शकतात त्यामुळे आताच योग्य भूमिका घेणं गरजेचं असल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शांत आणि संयमी असले तरी ईडी विरोधात आक्रमक होण्यासाठी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे
थेट केंद्राशी पत्रव्यवहार पण अद्याप उत्तर नाही….
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी काहीजणांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, मी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्याने 'ईडी'च्या माध्यमातून मला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी केला होता. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. या दोन गोष्टीनंतर शिवसेनाभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या काही घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवली होती, किरीट सौमय्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती तसेच संजय राऊत यांनी नुकताच आयएनएस विक्रांत वाचवण्यात घोटाळा झालं असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार ते वारंवार केंद्राकडेही करत आहेत पण अद्याप त्यांना उत्तर मिळत नाहीय
ईडीच्या रडारवर कोण कोण?
प्रताप सरनाईक
टॅाप सिक्युरिटीच्या कथित घोटाळा प्रकरणी
भावना गवळी
भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप
अनिल परब
अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप
अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून तपासणी 10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप
आनंदराव अडसूळ
सिटी बॅंकेच्या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक केल्याचा आरोप सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप
संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे