Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे इतर पक्षांचाही गोंधळ होत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात येत होते. तर, भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आले. राज ठाकरे यांनी नव्याने घेतलेल्या भूमिकेवर आता उलट चित्र दिसत असल्याचे दिसते. भाजपकडून राज यांच्या भूमिकेचे स्वागत होत असताना महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येत आहे.


महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राज यांनी मशिदीवरील भोंग्याचा वाद काढण्यााऐवजी महागाई, इंधन दरावरून केंद्रावर टीका करायला हवी होती, असे महाविकास आघाडीच्या गोटातून बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात एकही शब्द भाजपविरोधात नसल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. तीन वर्षापूर्वी राज ठाकरे यांच्या प्रेमात असणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सध्या त्यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी मराठी माणूस, मराठी अस्मिता, भूमीपुत्रांना न्याय आदी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांच्या पक्षाला लक्षणीय कामगिरी केली. मनसे स्थापनेनंतर झालेल्या 2009 च्या लोकसभा  निवडणुकीत मनसेने लक्षणीय मते घेतली होती. त्याच्या परिणामी मुंबईत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. तर, विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. तर, मुंबई महापालिकेत 27 नगरसेवक निवडून आले. मनसेने नाशिक महापालिकेत बहुमत मिळवत सत्ता ताब्यात घेतली. या दरम्यानच्या काळात राज यांच्या निशाण्यावर शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस होती. मात्र, त्यानंतरच्या काळात मनसेला धक्का बसला. नाशिक महापालिकेची सत्ता गेली. तर, आमदारांची संख्या घटली. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या घटली. 


लाव रे तो व्हिडिओ!


सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यावेळी त्यांनी मनसेचे खासदार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे हात बळकट करतील असे म्हटले होते. मात्र, पाच वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारवर टीकास्त्र सोडले. राज यांनी एकही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान मोदी यांची आश्वासने आणि त्यातील तफावत दाखवत भाजपविरोधात प्रचाराची राळ उडवली होती. याच दरम्यान त्यांनी व्यंगचित्राची मालिकाही सुरू केली होती. 


राज यांच्यावर आरोप 


राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सल्लामसलत करत या प्रचारसभा घेतल्याचा आरोप भाजपच्या गोटातून करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी भाजपविरोधाची सुपारी घेतली असल्याच्या आशयाचे वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. 


भाजपपूरक भूमिका


शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याची टीका भाजपकडून करण्यात येऊ लागली. त्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेची असलेली हिंदुत्ववादी प्रतिमा राज यांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी काही भूमिका भाजपपूरक असल्याची टीका राज यांच्यावर होऊ लागली आहे.