मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत  (Mumbai) कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढत आहे. परंतु, नागरिकांनी घाबरून जाण्याचे  कोणतेही कारण नाही. कोरोना विरोधात लढण्यासाठी पालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती मुंबई महालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली.  


महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बीकेसीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "लोकांनी  घाबरून जावे अशी  वक्तव्ये आम्ही पहिल्यापासूनच केलेली नाहीत. कोरोना वाढत असला तरी लोकंनी घाबरुन जावू नये. घाबरण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करत काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचं  संकट गंभीर आहे परंतु, आम्ही संकटांना घाबरत नाही. खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं. प्रत्यक्ष काम करून दाखवा असं आवाहन यावेळी महापौर पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केले. 


"मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कोरोना विरोधातील लढाईसाठी पालिकेची पूर्ण तयारी  झाली आहे. पालिका रूग्णालयांमध्ये अडीच  हजार बेड उपलब्ध आहेत. बीकेसीत आतापर्यंत एकही आयसीयूतील रूग्ण नाही. 20 हजार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 हजार लक्षणे नसलेले रूग्ण आहेत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे," अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी यावेळी दिली. 


महापौर पेडणेकर म्हणाल्या, "मी अनेक वेळा बीकेसी सेंटरची पाहणी केली आहे. येथील कर्मचारी आणि रूग्णांसोबत चर्चा  केली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. आपल्याकडे एकही आयसीयू रूग्ण नाही, आपण डेंजर झोनमध्ये नाही."


विरोधकांवर टीका 
"लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नका, अर्थाचा अनर्थ करत विरोधकांनी चुकीचे मेसेज देऊ नयेत. विरोधक लोकांना उकसवत आहेत, असा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवर केला. 


महत्वाच्या बातम्या