BJP Leader Ashish Shelar : भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे समोर आले. या प्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या  मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 


भाजप नेते आशिष शेलार यांना यापूर्वीदेखील धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती ही अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे.  आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांनी धमकी येणाऱ्या दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे.


तर त्यापूर्वी एका अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार  यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.  या धमकीबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. 


सरकारविरोधात आक्रमक असल्याने धमकी


आशिष शेलार सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


आशिष शेलार यांचे गृहमंत्र्यांना पत्र


दरम्यान, आशिष शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. आशिष शेलार यांनी पत्रात म्हटले की, सतत लोकप्रतिनिधींना धमक्या येण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही बाब अधिक गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. तातडीने काल पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली असून सदर पत्रात ते दोन मोबाईल नंबरची सविस्तर माहिती तपासासाठी पोलीसांना दिली आहे. माझ्या कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी ज्या पध्दतीने देण्यात आल्या आहेत, ही बाब गंभीर वाटते त्यामुळे आपल्या ही निदर्शनास आणून देत आहे.  ज्या भाषेत आणि ज्या त्वेषाने समोरच्या व्यक्ती बोलत होते त्यावरुन सदर प्रकरण मला अत्यंत गंभीर वाटत असल्याचेही आशिष शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.