कल्याण : महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्यात आहेत. 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातुन महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना येताना अरटीपीसीआर टेस्ट करून अहवाल सोबत आणणे गरजेचं आहे. राज्यातील रस्तेमार्गावरील सीमेवर याची कडोकोट अमलबजावणी सुरू आहे. मात्र, रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांकडून मात्र आरटीपीसीआर चाचणीला ठेंगा दाखवला जात असल्याचे दिसून आले आहे. 


मध्य रेल्वेवरील एक प्रमुख जंक्शन असणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकातही लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आणि एक्स्प्रेस थांबतात. या गाड्यांमधून हजारो परप्रांतीय प्रवासी शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे या परराज्यातील प्रवाशांची चौकशी करून त्यांची वैद्यकीय तपासणीचे कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर 3 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. रेल्वे पोलीस आणि केडीएमसीचे पथक परराज्यातून आलेल्या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या नागरिकांची चौकशी करत आरटीपीसीआर अहवालची मागणी करतात. हा अहवाल नसल्यास कल्याण स्टेशनवर त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. दरम्यान परराज्यातुन कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे सुमारे 90 टक्के प्रवाशी हे टेस्ट करून येत नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. मुळातच ही आरटीपीसीआर टेस्ट म्हणजे काय आणि ती करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत याची कोणतीच कल्पना या परराज्यातील प्रवाशांना नसल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकी काही जणांकडे एबीपी माझाने विचारणा केली असता आम्ही कोवीडची कोणतीही चाचणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.


एकीकडे राज्यातील आणि कल्याण डोंबिवलीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. ज्याचे सकारात्मक परिणामही सध्या दिसू लागले आहेत. मात्र, परराज्यातुन येणाऱ्या या प्रवाशांमुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना आणि कोरोनावर येऊ असलेल्या नियंत्रणाला खिंडार पडू शकते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार संपूर्णपणे सतर्कता बाळगून आहे. मात्र, परराज्यातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या या नागरिकांमूळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.


राज्यात कोरोना आलेख उतरणीला


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल (मंगळवारी) 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69% एवढे झाले आहे.