मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे.  करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज मुंबईने दीड कोटीचा टप्पा गाठला आहे.  


कोविड-19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी लशीची मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज  अखेर साध्य करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.


मुंबईसह देशभरात 16 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर  फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी 2021 ला 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी 1 मार्च,  45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी  1 एप्रिल  18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले. 



आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या लसीकरणाचा विचार करता पहिली व दोन्ही मात्रा मिळून 1 कोटी 50 लाख 67 हजार 883 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 92 लाख 36 हजार 500  नागरिकांचे कोविड लसीकरण  करावयाचे आहे. त्यापैकी आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत  92 लाख  4 हजार 950    नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर 58 लाख 62 हजार 933 (63 टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. कोविड लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून संचालित होत असलेल्या कोविन संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेली ही आकडेवारी आहे.


मुंबईत आज 347 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू


गेल्या 24 तासात मुंबईत 347 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 363 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 3326 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,36,947 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2761 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.