Mumbai Corona Update : देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (रविवारी) राज्यात 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Coronavirus) झाली. तर  2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच संपूर्ण राज्याचा विचार केला तर तुलनेनं मुंबई शहरात सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अशातच कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच मुंबईत कोरोनाची झीरो डेथ नोंदवण्यात आली आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासांत 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 5030 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे.


राज्यात काल (रविवारी) 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.39 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


कोरोनाच्या जिनोम सिक्वेसिंगचे धक्कादायक निष्कर्ष समोर 


कोरोनाच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीतील एकूण 343 नमुन्यांमध्ये 'डेल्टा व्हेरिअंट' चे 54 टक्के, 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह'चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळून आल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत हे तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष आहेत. कोविड प्रतिबंधक लस घेणं, प्रतिबंधात्मक निर्देशांचे कठोर पालन आवश्यक असल्याचं अधोरेखित झालं आहे. कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. 


लसिकरणाचा झाला कसा फायदा?
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या 54 नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त 7 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. 54 पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही*. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या 168 नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त 46 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या 7 जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.


याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 121 नागरिकांना बाधा झाली. त्यातील 57 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाब ग्रस्त होते. यातील दोघांना 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' तर एकास 'डेल्टा व्हेरिअंट'ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले. 


वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण 343 रुग्णांपैकी 29 जण (8 टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी 11 जणांना 'डेल्टा व्हेरिअंट', 15 जणांना 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' आणि 3 जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.