Coronavirus Precaution  देशभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याआधीच हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयाने महत्त्वाचा दावा केला आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


हैदराबाद येथील AIG रुग्णालयात झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचा एक-एक डोस Mix&Match पद्धतीने देण्यात आल्यानंतर तब्बल चारपटीने अॅण्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी म्हटले की, 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेत या कॉकटेल डोसचा वापर केल्यास अधिक फायदा होईल असा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन ICMR ला सोपवण्यात येणार आहे. 


44 जणांवर झाली चाचणी


रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, या चाचणीमध्ये 44 जणांनी सहभाग घेतला होता. सर्वांची चार गटात विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटात 11 जणांचा समावेश होता. पहिल्या गटातील सर्व 11 जणांना कोवॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले. दुसऱ्या गटाला दोन्ही डोस कोविशिल्डचे, तिसऱ्या गटाला पहिला डोस कोवॅक्सिनचा व दुसरा कोविशिल्डचा आणि चौथ्या गटाला पहिला डोस कोविशिल्ड व दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला. 


या गटातील 44 लोकांवर 60 दिवस देखरेख ठेवण्यात आली होती. AIG रुग्णालयाच्या संशोधकांना आढळले की,  एकाच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत ज्यांना संमिश्र डोस देण्यात आले. त्यांच्यात कोरोनाविरोधातील अॅण्टीबॉडी 4 पटीने अधिक वाढली आहे. 


या चाचणीसाठी 330 लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. ज्यांनी लशीचा एकही डोस घेतला नाही आणि ज्यांना कोरोनाची लागणही झाली नव्हती. मात्र, त्यातील फक्त 44 लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाविरोधात अॅण्टीबॉडीज आढळल्या नाहीत. 


या संशोधनात सहभागी असलेल्या डॉक्टरांनी म्हटले की, जर भारतात 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या PRECAUTION डोस लसीकरण मोहिमेत आता कॉकटेल डोस दिल्यास त्याचा अधिक फायदा होणार आहे. याचाच अर्थ ज्यांनी कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना कोविशिल्ड आणि कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना कोवॅक्सिनचा डोस दिल्यास  अधिक चांगले परिणाम दिसू शकतात.