मुंबई : देशात कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आजही कोरोना रूग्णसंख्येतील घट कायम आहे. मुंबईत आज एकूण कोरोना रूग्णसंख्या 4 हजारांखाली आहे.


मुंबईत गेल्या 24 तासांत 3876 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 41 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. 9150 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 5 लाख 46 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के झाले आहे. सध्या मुंबईत 70 हजार 373 सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 62 दिवसांवर गेला आहे. 


राज्यात आज 48 हजार 700 रुग्णांची नोंद


राज्यात आज  48 हजार 700 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 71 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण 524 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 65 हजार 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 116 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 115मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


राज्यात आज विक्रमी लसीकरण


कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला  4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.