मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढत असल्याने मुंबईत आणखी 4 ठिकाणी कोविड सेंटर उभारली जात आहेत. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही कोविड सेंटर्स उघडली जाणार आहेत. मुंबईत एकूण 5300 बेड तर 800 आयसीयू बेड असलेली कोविड सेंटर उभारली जाणार आहेत.  MMRDA, CIDCO, MHADA, BMC यांच्या अंतर्गत ही कोविड सेंटर्स उभारली जाणार आहेत. 


या ठिकाणी उभारणार कोविड सेंटर्स
कंजूरमार्ग (MMRDA)
बेड 2000/ आयसीयू बेड 200


मालाड ( रहेजा ग्राउंड CIDCO)
बेड 2000 / आयसीयू बेड 200 


सोमय्या ग्राउंड (MHADA)
बेड 1000 / आयसीयू बेड 200


महालक्ष्मी (BMC)
बेड 300 / आयसीयू बेड 200
 
एकूण बेड 5300, आयसीयू बेड 800



महापौर पेडणेकर म्हणाल्या....


सद्यस्थिती पाहता मुंबईत नव्यानं कोविड सेंटर आणि रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली जात असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सध्या रेल्वेचे 2800 बेड तयार असून, त्याच्यावर महानगरपालिकेचे अधिकारी विचार करत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. वरळीमध्ये शनिवारी एनआयसीएमध्ये बेडची संख्या वाढवण्यात आली. तिथं 200 ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आल्याचं म्हणत त्यांनी अत्यावश्यक माहिती दिली.  येत्या काळात एकट्या वरळीमध्ये जवळपास अडीच हजार बेड तयार असतील. तर, कांजूरमार्ग, मालाड या भागातही त्याच धर्तीवर कामं सुरु आहेत असंही किशोरी पेडणाकर म्हणाल्या. येत्या काळात मुंबईत मालाड, कांजूरमार्ग, वरळी या भागांमध्ये कोविड सेंटरमध्ये एकूण 5800 बेड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. यापैकी काही बेड हे आयसीयु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अशा सुविधांसाठी विभागलेले असतील.