Mumbai Corona Update : महाराष्ट्राची राजधानी मुंबईकोरोनाची स्थिती सुधारताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत, मात्र मृतांचा आकडा वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. 21 डिसेंबरपासून मुंबईत कोरोनामुळे एकूण 237 मृत्यू झाले आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे यापैकी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 199 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी मृतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही.


मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डीन डॉ. अडसूळ यांनी 'एबीपी न्यूज'ला सांगितले की, आतापर्यंत रुग्णालयात 199 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यापैकी 160 हून अधिक 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते. रुग्णालयात सर्वाधिक मृत्यूबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, गंभीर रुग्णांना रुग्णालयात पाठवले जाते. मृत्यूचे प्रमाण जास्त असू शकते पण घाबरण्यासारखे काही नाही.


गेल्या काही दिवसांत अनेकांना लागण
अधिकृत आकडेवारीनुसार, 23 जानेवारी रोजी मुंबईत 2550 कोरोना रुग्ण आढळले आणि 13 लोकांचा मृत्यू झाला. 24 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1857 होती, तर 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 25 जानेवारीला 1815 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आणि 10 जणांचा मृत्यू झाला तर, 26 जानेवारीला 1858 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. 27 जानेवारी रोजी कोरोनाचे 1384 रुग्ण आढळले आणि 12 जणांचा मृत्यू झाला.


मुंबईत शुक्रवारी 1312 बाधित आढळले
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 1312 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 10 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4990 आहे. मुंबईत 193 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. शहरातील 37,575 खाटांपैकी सध्या 2652 खाटा भरल्या आहेत. मुंबईत कोरोनामुळे 20 इमारती सील करण्यात आल्या आहेत, तर शहरात आता कोणताही कंटेनमेंट झोन नाही. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14,344 आहे.


काय म्हणाले मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त?
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी बहुतांश लोक इतर आजारांनी ग्रस्त आहेत. याशिवाय काही रुग्ण मुंबईबाहेरचे आहेत. आठवडाभरात मृतांची संख्या कमी होईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha