मुंबई : 'बेस्ट'चा संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संगनमतानं झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शिवसेना सदस्यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसने हा सवाल उपस्थित केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप 16 तासांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर मागे घेण्यात आला.


बेस्ट समितीच्या सभेत बेस्टचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यावेळी शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी 'बेस्टच्या कर्मचाऱ्यांना एकदिवसीय संप करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच मान्यता दिली. तसंच एका दिवसानंतर संप मागे घेण्यासही सांगितलं' असं विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

बेस्टचा अर्थंसंकल्प आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जाणार


सामंतांचे उद्गार ऐकून सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांच्याही भुवया उंचावल्या. त्यानंतर सामंत यांनी आपल्या विधानाचा गैरअर्थ काढल्याची सारवासारव केली. त्यामुळे बेस्टचा एकदिवसीय संप हा निव्वळ फार्स होता का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

‘मातोश्री’वरील बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे


ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. दुपारी चार वाजता संप मागे घेण्यात आला, तरी वाहतूक सुरळीत होईपर्यंत संध्याकाळ उलटून गेली. या संपाचं नाट्य शिवसेना, बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना यांनी रचलंय का असा सवालही विरोधक उपस्थित करत आहेत.

पगार वेळेवर होतील असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर शशांक राव यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली. मात्र, बेस्टचा कारभार असाच सुरू राहिला तर एक दिवस बेस्ट बंद पडेल अशी भीती देखील उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली होती.