मुंबईत दादरमध्ये पेट्रोल पंपावर आग
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 08:33 PM (IST)
मुंबईत दादरमध्ये पेट्रोल पंपावर आग लागली आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
प्रातिनिधक फोटो
मुंबई : मुंबईच्या दादरमधील चित्रा टॉकीज जवळील एचपीच्या पेट्रोल पंपाला आज संध्याकाळी अचानक आग लागली. या घटनेत 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आगीच कारण अजून स्पष्ट नाही, मात्र मीटर बॉक्समधील तांत्रिक बिघाडामुळे स्फोट लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दादर चित्रा टॉकीजमागच्या टॅक्सीमॅन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या पेट्रोल पंपावर ही आग लागली होती. पेट्रोलच्या टँकरमधून टाकीत पेट्रोल भरत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं इथं स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की हिंदमाता मार्केट पर्यंत हा आवाज ऐकला गेला. स्फोटामुळे पंपाजवळ असणारे कर्मचारी आणि काही नागरिक गंभीररित्या जखमी झाले. पेट्रोलपंपाच्या ऑफिसचं या आगीत मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलानं वेळेवर आग विझवल्यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.