मुंबई : अंतर्गत गटबाजीच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई काँग्रेसनं अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 115 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.


पहिल्या यादीत काँग्रेसच्या विद्यमान 19 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप करत आतापर्यंत 8 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये कामत गटातील नगरसवेकांचा समावेश आहे. त्यामुळे निरुपम यांच्याकडून जाहीर होणाऱ्या यादीत कुणाकुणाची नावं असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

निरुपम यांचं भाजपशी साटंलोटं, काँग्रेस संपवण्याचा डाव : आंबेरकर


मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कारभारामुळे  काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई काँग्रेसला झटका, देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत


निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत असल्याचंही आंबेरकर यांनी म्हटलं आहे. संपूर्ण पक्ष संपवण्याची तयारी निरुपम यांनी सुरु केल्याचा घणाघातही आंबेरकरांनी केला. निरुपम यांचं भाजपशी साटंलोटं असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

नारायण राणे मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत


गुरुदास कामत यांच्यापाठोपाठ नारायण राणेही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नारायण राणे मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत. मात्र मुंबईव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी राणे प्रचार सभा घेणार असल्याचं समजतं.

पाहा मुंबईतील काँग्रेसच्या 115 उमेदवारांची यादी