मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि चर्चेत राहिलेले आयपीएस अधिकारी राकेश मारिया सेवानिवृत्त होत आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणात वाद झाल्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरुन मारियांची उचलबांगडी झाली आणि त्यांना होमगार्ड्सचं महासंचालकपद देण्यात आलं. निवृत्तीपूर्वी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राकेश मारियांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रकाशझोत टाकला आहे.
राकेश मारियांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे मोठमोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावून फीत कापणं, हे पोलिस आयुक्तांचं एकमेव काम नसतं. शीना बोरा हत्येची केस आरुषी तलवार हत्याकांडाप्रमाणे होऊ नये, यासाठी मी स्वतः तपासात लक्ष घालून असल्याचं मारिया म्हणाले. पीटर मुखर्जीची चौकशी करण्यासाठी मला एक दिवसाचाच वेळ मिळाला. तू दिलेल्या जबाबावर मी समाधानी नाही. पुढच्या दिवशी 12 वाजता मी जेव्हा पीटरला पोलिस स्टेशनला बोलवलं, तोपर्यंत माझी बदली करण्यात आली होती. मात्र पीटरकडे एक संशयित म्हणून पाहा, असे आदेश मी माझ्या अधिकाऱ्यांना लेखी दिल्याचं राकेश मारियांनी स्पष्ट केलं. शीना बोरा हत्या प्रकरणापूर्वी मी कधी पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांना भेटलोही नाही किंवा त्यांच्याशी बोललोही नाही, असा दावाही मारियांनी केला. मी स्वतः सरकारला पत्र लिहून या प्रकरणात मोठा वकील नेमण्याची विनंती केली होती. मुखर्जी दाम्पत्य या प्रकरणाला वेगळं वळण देण्याची शक्यता मला वाटत होती, असं राकेश मारिया म्हणाले. मी कधीच कुठल्याची आरोपीची एकट्याने चौकशी केलेली नाही. माझ्यासोबत नेहमी 12 अधिकारी उपस्थित असायचे, असं मारिया सांगतात. सीबीआयने उभा केलेला खटला हा मी गोळा केलेल्या पुराव्यांवर आधारित आहे, असा दावाही राकेश मारियांनी केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात मला नको तितका इंटरेस्ट असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. मात्र तितकाच रस मी इस्थर अनुया हत्या प्रकरण, नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणातही घेतला होता. याकुब मेमनला फाशी झाली त्यादिवशीही मी स्वतः फौजेनिशी रस्त्यांवर तैनात होतो. लालबागमध्ये हिंसाचार उसळला होता, तेव्हाही मी फील्डवर उतरलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली. लहानपणापासूनच मला पेचात टाकणारी प्रकरणं सोडवण्याची आवड होती. याच आवडीमुळे मी अशाप्रकारच्या केसमध्ये इंटरेस्ट घ्यायचो, असं राकेश मारिया सांगतात. निवृत्तीनंतर मला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नाही. मी स्वतःचं पुस्तक लिहिणार आणि क्रीडा विश्वाची सेवा करणार, असा मानस राकेश मारियांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

बड्या लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्षे रखडला: मारिया

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांची सीबीआय चौकशी

 BLOG: राकेश मारिया – एक तडफदार अधिकारी

...म्हणून राकेश मारियांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी?