मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यापुढे मुंबईतील सर्व पालिकांच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत आठवड्यातून दोन वेळा गाणं बंधनकारक असेल.


काय आहे वाद?

शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले होते. मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी 'कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम्' गाणार नाही, असं म्हणत नवा वाद छेडला होता.

शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास हायकोर्ट


'आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी 'वंदे मातरम्'चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका' असं अबू आझमी म्हणाले होते.

काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली.

मद्रास हायकोर्टाचा निर्णय काय होता?

प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आठवड्यातून किमान एकदा ‘वंदे मातरम्’
गाण्यात/वाजवण्यात यावं (शक्यतो सोमवार किंवा शुक्रवार)

सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, फॅक्टरीमध्ये महिन्यातून किमान एकदा ‘वंदे मातरम्’ गाण्यात/वाजवण्यात यावं

एखादी व्यक्ती किंवा संघटनेला ‘वंदे मातरम्’ गाताना किंवा वाजवताना अडचणी येत असतील, तर त्यावर
सक्ती करता कामा नये.