Mumbai Coastal Road News: मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्टचं (Coastal Road Project) काम महिनाभर लांबणार आहे. बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामाला विलंब होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) देण्यात आली आहे. अशातच कोस्टल रोड बांधकामामुळे पाच महिन्यांसाठी वाहतुकीतही बदल केला जाणार आहे. दक्षिण मुंबईतून (South Mumbai) प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 


मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडची डेडलाईन हुकणार आहे. अशातच सध्या कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आहे. मरीन ड्राइव्हजवळील एनएस मार्गावर या रोडचं काम सुरू आहे. त्यापूर्वी मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील कॅरेजवेवर म्हणजेच, तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यान एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचं काम करायचं आहे. या कामाला अंदाजे पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच, या दिवसांत मुंबईकरांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहनही मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 




मिळालेल्या माहितीनुसार, एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचं काम याच आठवड्यात सुरू होणार असून या कामासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी प्रवासाठी एनएस मार्गाचा वापर करणं टाळावं, अशी सूचना मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.


कोस्टल रोडची डेडलाईन हुकणार


मुंबई महापालिकेचा  महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रोजेक्टचे काम महिनाभर लांबणार आहे. बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोस्टल रोडच्या बोगद्याचा काम पूर्ण होण्यास एक महिना उशीर होणार आहे. त्यामुळे बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मार्च महिन्यातील डेडलाईन हुकणार आहे.