मुंबई : भारतीय लष्कराने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या तीन पादचारी पुलांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते या पुलांचं लोकार्पण झालं.
मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या स्थानकांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इतर दोन पुलांचं लोकार्पण करण्यात आलं.
विशेष म्हणजे एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लोकलचा पर्याय निवडला. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि खासदार अरविंद सावंतही त्यांच्यासोबत होते. सीएसटीएममधील कार्यक्रम आटपून कमीत कमी वेळात परेल स्टेशन गाठण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला.
एल्फिन्स्टन पुलावर सप्टेंबर महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी हे पादचारी पूल उभारले.
लष्कराच्या बॉम्बे सॅपर्स या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचा पादचारी पूल आंबिवली, तर करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळमध्ये पादचारी पूल उभारला आहे. केवळ आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचं काम वेळेत पूर्ण करण्यात आलं होतं, तर अडचणींमुळे इतर पुलांच्या कामाला विलंब झाला.