Mumbai Crime News : मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai News) पुन्हा एकदा महिलांच्या (Womens Safety) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोरिवलीत (Borivali) घडलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai Crime) महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला आहे. शेअर रिक्षात सह प्रवाशाकडून महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहप्रवाशाच्या कृत्यामुळे भेदरलेल्या महिलेनं धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची घटना बोरिवलीत घडली आहे.                               


एका 29 वर्षीय महिलेचा चालत्या रिक्षात विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी बोरिवली परिसरात घडली. घाबरलेल्या महिलेनं मदतीसाठी आरडाओरडा केला, पण तरिदेखील मदत न मिळाल्यामुळे तिनं अचानक रिक्षातून उडी घेतली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सीसीटिव्ही फुटेज तपासून दोन आरोपींना गैरवर्तन आणि विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपींमध्ये प्रवाशासह रिक्षाचालकाचाही समावेश आहे.                          


प्रकरण नेमकं काय?                                                                


बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत. बुधवारी सकाळी पिडीत तरुणी रिक्षात बसली. रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसलेला होता. रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. रिक्षा सुरू होताच तरुणीशेजारी बसलेल्या व्यक्तीनं तरुणीसोबत सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तरुणीनं दुर्लक्ष केलं, मात्र त्याचे चाळे थांबत नसल्यानं तिनं रिक्षाचालकाच्या निदर्शनास आणून त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितलं. रिक्षा चालकानं तरुणीच्या सांगण्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. रिक्षा थांबत नसल्याचं पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. तरिही रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याचं पाहून तरुणीनं थेट धावत्या रिक्षामधून उडी मारली. या घटनेत पिडीत तरुणीही किरकोळ जखमी झाली. 


आवाज ऐकून तेथे उपस्थित असलेल्या एका पोलिसानं तात्काळ ऑटो थांबवून प्रकरणाची चौकशी केली. तसेच, या प्रकरणाची माहिती बोरिवली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.