मुंबई : आपण अवतीभवती अशी उदाहरणं पाहतो जी सर्व काही असून देखील निराश, नाउमेद होतात आणि कठोर पावलं उचलतात. मात्र चिराग चौहान या मुंबईकर माणसाची कहाणी जर तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल आणि नक्कीच उर्जा मिळेल. कोणत्याही परिस्थितीवर तिथून उभे राहत यश कसे संपादीत करावे याचा मूलमंत्र चिरागकडे आहे.


2006 ला इतर सर्व तरुण प्रमाणेच डोळ्यात भविष्याची स्वप्न घेऊन चिराग चौहान हा तरुण कष्ट करत होता. त्याला सीए बनायचे होते. त्यासाठी मन लावून अभ्यास सुरूहोता. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एका कंपनीत तो शिकायला जात होता. पण नियतीच्या मनात वेगळाच खेळ होता. 11 जुलै 2006 ला चिराग घरी येत असताना त्याच्या लोकलच्या डब्यात बॉम्बस्फोट झाला. ज्यावेळी त्याचे डोळे उघडले त्यावेळी त्याच्यावर सर्वात मोठा आघात झाला कारण यापुढे आयुष्यात तो कधीही स्वत:च्या पायावर चालू शकणार नव्हता. बॉम्बस्फोटात त्याच्या मणक्यात लोकलचा डब्याचा पत्रा घुसला होता त्यामुळे त्याच्या मज्जा रज्जू ला दुखापत होऊन पाठीपासून खालचा भाग पूर्णतः अधू झाला. पण म्हणून चिरागने आयुष्य थांबवलं नाही.


सुरुवातीला के ई एम आणि त्यानंतर 3 महिने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यावर उपचार सुरू होते. शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी पूर्ण करून तो घरी आला. आता चिरागच्या समोर मोठे संकट उभे होते. पण त्यानंतर त्याने अशा परिस्थितीत देखील सीए सारखा कठीण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यात तो पास देखील झाला. 2008 सालापासून त्याने नोकरी करण्यास सुरुवात केली. दोन मल्टिनॅशनल कंपनी मध्ये त्याने काम केले. अश्यात गाडी चालवण्याचे वेड त्याला होते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी गाडी शिकण्यासाठी जे बदल करावे लागतात ते त्याने आपल्या गाडीत करून घेतले आणि गाडी चालवण्यास तो शिकला. त्यासाठीचा विशेष परवाना देखील त्याने काढून घेतला आहे.  


मात्र नोकरीत मन रमत नव्हते. म्हणून त्याने 2013 साली स्वतःची कंपनी सुरू केली. त्यानंतर आतापर्यंत दोन स्टार्टअप देखील सुरू केलेत. अशा प्रकारे प्रगती करून आज त्याने स्वतःचे मोठे ऑफिस घेतले असून त्याचे उद्घाटन आपल्या परिवारासह त्याने केले आहे. चिरागचा हा प्रवास खरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.