मुंबई: चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal) कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात करत असताना बॅरिकेट्स लावण्यात येत होते, त्यावेळी काही भाविक आतमध्ये शिरले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवर सर्व स्तरातून टीका होत आहे.
शनिवारी रात्रीचा हा व्हिडीओ आहे. शनिवार-रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. त्याचवेळी चिंचपोकळीच्या गणेश मंडळामध्ये (Mumbai Chinchpokli Chintamani Mandal) हा प्रकार घडल्याचं समोर आलं. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत होते. त्या दरम्यान ही घटना घडली.
एका तरुणाला मंडळाचे पाच-सहा कार्यकर्ते मारहाण करत असल्याचं या व्हिडीओतून स्पष्ट दिसतंय. या ठिकाणी जवळपास पोलीसही दिसत नाहीत.
दरम्यान, चिंचपोकळीतील व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर मंडळाचे सचिव प्रणील पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "गणेश दर्शनासाठी झालेली ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. कार्यकर्त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मारहाण झालेला तो मुलगा नशा करुन आला होता. तसेच त्याने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा प्रकार घडला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. गर्दीच एवढी होती की त्या ठिकाणी कुणाला जाता आला नाही."
या आधी कोणत्याही भाविकाला काही ईजा झाली तर त्याच्यावर मंडळात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत असं सांगत प्रणील पांचाळ म्हणाले की, आम्ही पोलिसांकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे.
या आधी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाची सुरक्षा रक्षकासोबत बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची अरेरावी वाढली असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी कुठेतरी थांबली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाविकांतून व्यक्त होत आहे.