मुंबई : मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर अवघ्या एका रुपयात उपचार करता येणं शक्य होणार आहे. पाच रेल्वे स्थानकांवर हे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहेत.
दादर, कुर्ला, मुलुंड, घाटकोपर आणि वडाळा स्टेशनवर पुढच्या आठवड्यापासून हे दवाखाने सुरु सुरु होतील.
प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मध्य रेल्वेने एका खासगी संस्थेसोबत हातमिळवणी करत, एका रुपयात दवाखाना सुरु करण्याची योजना आखली आहे.
रेल्वे अपघात, छातीदुखी तसंच प्रसुतीसंदर्भात त्वरित उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना सहज आणि स्वस्त दरात वैद्यकीय उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य हेतू आहे.
प्रत्येक दवाखान्यात एमबीबीएस आणि एमडी डिग्री असलेले डॉक्टर रुग्णांच्या सेवेत असतील. 24 तास सुरु राहणाऱ्या या दवाखान्यांमध्ये दर दिवशी त्वचारोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञही असतील.
या आठवड्यात पाच स्टेशनवर 'एक रुपयात दवाखाना' सुरु होईल. त्यानंतर मध्य आणि हार्बरच्या 19 स्टेशनवर त्यांचा विस्तार होईल. प्रत्येक पाच स्टेशनवर दरदिवशी किमान 100 प्रवाशांना तपासलं जाईल.
या दवाखान्यांमध्ये रक्त तपासणीसह औषधांची दुकानंही उपलब्ध असतील. सर्व रक्ताचे नमुने तपासणीसाठी वडाळ्याच्या पॅथलॉजी लॅबमधील पाठवले जातील. तसंच यात छोटं मेडिकल, पॅथलॉजी किट्सही मिळतील.
दरम्यान, मध्य रेल्वेवरील पहिल्या टप्प्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर ही योजना पश्चिम रेल्वे मार्गावरही सुरु करण्यात येईल, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं.