शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ती अन्यत्र हलवली जाणार नाही, असं उत्तर प्रशासनाकडून महापौरांना पाठवलं जाणार आहे. घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असं पत्र सलीम खान यांनी महापौरांना दिलं होतं.
सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सुचवलं होतं. मात्र मुतारी सुरुही झाली नसताना केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने रहिवासी त्याला विरोध करत असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
जर प्रत्येकाने त्रास होत असल्याची तक्रार केली, तर सार्वजनिक मुतारी किंवा शौचालय उभारताच येणार नाही. वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्डवर पर्यटक तसंच पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यांच्यासाठी येथे मुतारीची सोय करण्याची आवश्यकता आहे. पाणी, मलनिस्सारण वाहिनी, वीज यांची सोय केली जाणार आहे. तसंच शौचालयाच्या देखभालीसाठी 24 तास कर्मचारी नेमण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं.
हागणदारीमुक्तीचा सदिच्छादूत सलमानलाच घरासमोर टॉयलेट नको
हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असणारा सलमान खान स्वतःच्याच घरासमोर बांधलं जाणारं सार्वजनिक शौचालय हटवण्याच्या प्रयत्नात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सलमान आणि सलीम खान यांच्यासोबत शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनाही या संभाव्य शौचालयाचा त्रास होऊ लागला आहे.