मुंबई : मुंबईतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला पाहून डॉक्टरही थक्क झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात टाचण्यांचा साठा आढळला आहे. टाचण्यांची संख्या एक-दोन नव्हे, दहा-बाराही नव्हे, तर तब्बल 200 हून अधिक आहे.

हा एक्स-रे ग्राफिक्सची कमाल नसून एका माणसाचा आहे. त्यामध्ये दिसणाऱ्या या बारीक रेघा म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातल्या टाचण्या आहेत. मुंबईतल्या जगजीवन राम रुग्णालयात आलेल्या या रुग्णावर उपचार करणं मुंबईतल्या डॉक्टरांपुढे एक मोठं आव्हान ठरलं आहे. कारण शेकडो पिना त्याच्या शरीरात घर करुन बसल्या आहेत.



एखाद्या व्यक्तीच्या शरीरात शेकडो टाचण्या जाऊच कशा शकतात, हे एक मोठं कोडं आहे. या पिना आल्या कशा हे रुग्णाच्या कुटुंबीयांनाही ठाऊक नाही. एका मांत्रिकासोबत या रुग्णाचा संपर्क झाला होता. त्याच मांत्रिकानं एखाद्या खाद्यपदार्थात घालून या टाचण्या त्याच्या शरीरात घातल्याचा दावा केला जात आहे.

56 वर्षीय बद्रीलाल मीणा रेल्वेत पाणीपुरवठा कर्मचारी आहेत. मूळ राजस्थानच्या कोटा शहरात त्यांचं घर आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना शुगरचा त्रास झाला. त्यानंतर पायावर हळूहळू जखमा व्हायला लागल्या. अचानक आलेल्या जखमांमुळे डॉक्टरही चक्रावले. त्यामुळे बद्रीलाल यांचा एक्स-रे काढण्यात आला. मात्र त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं.



पायापासून घशापर्यंत, हातापासून पाठीपर्यंत बद्रीलाल यांच्या शरीरात शेकडो टाचण्या आहेत. घशात रुतून बसलेल्या पिनांमुळे त्यांना बोलणं आणि खाणंही जिकीरीचं झालं आहे. बद्रीलाल यांच्यावर उपचार कसा करावा, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. त्यासोबतच इतक्या पिना नेमक्या शरीरात गेल्याच कशा, या प्रश्नानंही डॉक्टरांसह अनेक जण हैराण झाले आहेत.