आयकर उपायुक्ताला 3 कोटींची लाच घेताना अटक
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2017 07:46 AM (IST)
उपायुक्त जयपाल स्वामीला लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ अटक केली. जयपाल स्वामी कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारत होता.
फाईल फोेटो
मुंबई: मुंबई आयकर विभागातील बडा लाचखोर मासा गळाला लागला आहे. उपायुक्तासह तिघांना तब्बल 3 कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उपायुक्त जयपाल स्वामीला लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ अटक केली. जयपाल स्वामी कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारत होता. जयपाल स्वामीसह अटक केलेले अन्य लोक कोण, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. शिवाय इतकी मोठी रक्कम कोणत्या प्रकरणात स्वीकारली जात होती, ते ही अद्याप गुलदस्त्यात आहे. जयपाल स्वामीने आपल्या करिअरची सुरुवात राजस्थानामध्ये एक सरकारी शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर त्याने RPSC द्वारे पोलीस उपाधिक्षक पदही सांभाळलं होतं. त्यानंतर तो 2010 मध्ये भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आणि आयकर विभागात रुजु झाला होता. दरम्यान, सीबीआयला टीप मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी छापेमारी करुन, ही कारवाई केली.