मुंबई : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरुनही दोषी वाहनचालकाला शिक्षेत सूट देण्यात आली आहे. व्यवसाय आणि लिंग (जेंडर) याच्या आधारावर मुंबईतील मरिन ड्राईव्हमधील महिला स्पीच थेरपिस्टला शिक्षेत सवलत मिळाली आहे.
लज्जा शाह या डॉक्टर महिलेने तिच्या इनोव्हा कारने एका बाईकला धडक दिली होती. अपघातात 25 वर्षीय दुचाकीस्वार ज्योती सिंगचा कारखाली चिरडल्याने मृत्यू झाला, तर बाईक चालवणारा तिचा 22 वर्षीय भाऊ आकाश जखमी झाला होता. 25 मे 2015 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ हा अपघात घडला.
डॉ. लज्जा शाह ही एचएन रिलायन्स फाऊण्डेशन हॉस्पिटलमध्ये स्पीच थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. दोषी आढळलेल्या वाहनचालकाला केवळ ती महिला आणि डॉक्टर असल्याच्या कारणावरुन शिक्षेत सूट देण्यात आली आहे.
दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असतानाही महानगर दंडाधिकाऱ्यांनी तिला केवळ 72 हजारांच्या दंड बजावला. 'दोषी ही महिला आणि डॉक्टर असल्याने तिला तुरुंगवास ठोठावण्याऐवजी दंड आकारणं योग्य आहे' असं मत दंडाधिकारी व्हीआर दसारी यांनी व्यक्त केलं.
डॉ. लज्जावर कलम 279 (भरधाव वाहन चालवणे), 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे), 337 (इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. डॉ. लज्जाला पोलिस कोठडीही झाली नाही. कलम 304 अंतर्गत दोन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.
आकाश आणि ज्योती ऑफिसला जाण्याच्या घाईत होते. त्यामुळे त्यांनी धोकादायक कट मारल्याचा युक्तिवाद शाह यांच्या वकिलाने केला. मात्र रस्त्यावरील इनोव्हाच्या टायरचे मार्क्स पाहता, कार भरधाव असल्याचं दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं.
अपघाताच्या वेळी डॉ. शाह यांच्या गाडीत उपस्थित असलेला त्यांचा डॉक्टर आणि आकाश यांच्यासह सात जणांची साक्ष घेण्यात आली.