मुंबईत 700 रस्ते खोळंबले, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 08:44 PM (IST)
मुंबई : फक्त निवडणुकीच्या तोंडावर आणि पावसाळ्यातच राजकीय पक्षांना मुंबईतल्या खड्ड्यांची आठवण येते. मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात मुंबईतल्या रस्त्यांवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अपुऱ्या खडीमुळे मुंबईतल्या 700 रस्त्यांची काम खोळंबली, असं ट्वीट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण मुंबईतल्या एक दोन नव्हे तर तब्बल 700 रस्त्यांची कामं रखडली आहेत. मात्र खड्ड्यांचं खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून शिवसेनेनं आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. ठाण्यातल्या दगडाच्या खाणी बंद पडल्या आहेत, त्यामुळे मुंबईतल्या रस्त्यांच्या कामासाठी खडी मिळत नसल्याचा कांगावा शिवसेनेनं सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. 'मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना माझी वैयक्तिक विनंती आहे की ठाणे येथे थांबविण्यात आलेल्या खाणीच्या कामात लवकरात लवकर लक्ष घालावे.' असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/AUThackeray/status/857190820880859141 खाणीचे काम थांबल्यामुळे रस्त्यांची कामं, पावसाळ्यापूर्वीची पालिकेची कामे, रस्ते बांधकाम संस्थांना लागणाऱ्या साहित्यांचा तुटवडा भासत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या जवळपास 100 हून अधिक दगडांच्या खाणी विविध कारणांमुळे बंद आहेत. मुंबईतला रस्ते घोटाळा आणि खड्ड्यांचा मुद्दा पालिका निवडणुकीच्यावेळी चांगलाच गाजला. कदाचित त्यामुळेच शिवसेनेला स्पष्ट बहुमतापासून दूर रहावं लागलं. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिवसेनेनं भाजपला खड्ड्यात घालण्याचा कट आखलेला दिसत आहे. शाहकटशाहच्या राजकारणात कोण कुणाला खड्ड्यात पाडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र खड्ड्याचं राजकारण करण्यापेक्षा खड्डे बुजवले तर मुंबईकर जास्त खुश होतील.