मुंबई : कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड एका भारतीय व्यावसायिकाच्या जीवावर बेतली आहे. दुबईत समुद्रात बुडणाऱ्या कुत्र्याला वाचवताना 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दुर्दैवाने कुत्र्याचेही प्राण वाचू शकले नाहीत. 'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मुंबईतील अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरातील रहिवासी असलेला 41 वर्षीय नितीन शेणॉयला या घटनेत प्राण गमवावे लागले. तेजोरा टेक्नॉलॉजी लिमिटेड या आयटी कंपनीचा संस्थापक असलेला नितीन कामाच्या निमित्ताने अनेकदा दुबईला जायचा.
9 एप्रिलला नितीन पाम जुमैराहमधील सी फेसिंग बंगल्यात राहत होता. व्यावसायिक मित्रांशी मीटिंग झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडला. त्यावेळी बीचजवळ त्याला एक कुत्रा समुद्रात बुडताना दिसला. तेव्हा मागचा-पुढचा कोणताही विचार न करता त्याने समुद्रात उडी घेतली.
बुडणारा कुत्रा नितीनच्या मैत्रिणीचा होता, असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. नितीन समुद्रात शिरताच खोल पाण्यात खेचला गेला. त्याने आरडाओरडा करताच काही जण मदतीला धावले, मात्र नितीनला वाचवू शकले नाहीत. कुत्र्याचं काय झालं हे कोणालाच समजलं नाही.
घटनेच्या वेळी त्याची पत्नी मुंबईत होती. नितीनला पोहता यायचं, मात्र त्याला स्वीमिंग पूलमध्ये पोहण्याची सवय होती, समुद्रात तो फारसा गेलेला नव्हता, असं त्याच्या पत्नीने सांगितलं.
पोलिसांनी त्याला समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. नितीनच्या पोस्ट मार्टम अहवालात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.