मुंबई: गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट बुधवारी समुद्रात बुडाली होती. नौदलाच्या स्पीड बोटने नीलकमलला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला होता. स्पीडबोटच्या धडकेमुळे नीलकमल बोटीला भोक पडले होते आणि त्यामध्ये पाणी शिरुन बोट बुडाली होती. या दुर्घटनेत 14 जणांचा मत्यू झाला होता. या अपघातानंतर अनेकांनी भारतीय नौदलाविषयी सवाल उपस्थित केले होते. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या स्टंटबाजीमुळे हा अपघात घडला, अशीही कुजबुज सुरु होती. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावरुन हा अपघात नौदलाच्या स्टंटबाजीमुळे नव्हे तर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा जीव देऊन आणखी मोठा अनर्थ घडण्यापासून वाचवला, हा दुर्लक्षित पैलू समोर येत आहे. 


नौदलाच्या नव्या स्पीड बोटीचे इंजिनाची ट्रायल सुरु असताना त्यामध्ये नौदल अधिकारी शेखावत, कर्मवीर यादव हे ओईएम कंपनीचे कर्मचारी, इंजिनीयर टी. दीपक, मंगेश केळशीकर, प्रवीण शर्मा आणि हेल्पर निकोशे इतकेजण उपस्थित होते.  स्पीडबोटचे स्टेअरिंग कर्मवीर यादव यांच्या हातात होते. मात्र, ट्रायलदरम्यान स्पीडबोटच्या इंजिनात अचानक बिघाड झाला. त्यामुळे स्पीडबोट थेट नीलकमल बोटीच्या दिशेने वेगाने जाऊ लागली. स्पीडबोट ही नीलकमल बोटीच्या मध्यभागी धडकणार होती. मध्यभागी बोटीतील डिझेल टाकी असल्याने स्पीडबोट त्याला धडकली असती तर स्फोट झाला असता. ही गोष्ट नौदल अधिकारी शेखावत यांच्या लक्षात आली. तेव्हा शेखावत यांनी पुढे येऊन स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी स्पीडबोट वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे स्पीडबोट थेट नीलकमल बोटीच्या डिझेल टाकीला न धडकता बाजूला जाऊन आदळली. 


नौदल अधिकारी शेखावत यांना कर्मवीर यादवला बाजूला सारुन स्वत: स्टेअरिंग हातात घेताना सर्वात प्रथम आपणच समोरच्या बोटीवर धडकणार, याची पूर्ण कल्पना होती. मात्र, शेखावत यांनी शेवटपर्यंत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्पीडबोट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्पीडबोट नीलकमल बोटीला धडकल्यानंतर सर्वात पहिले समोर आपटून शेखावत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह स्पीडबोटमधून उडून थेट नीलकमल बोटीत जाऊन पडला. तर कर्मवीर यादवही गंभीर जखमी झाले. मात्र, बोटीवर असलेला हेल्पर निकोशे हवेत उंच उडून पुन्हा स्पीडबोटीत पडल्याने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. 


16 जणांचा जबाब, नौदलाची चूक नाही?


या दुर्घटनेची सध्या चौकशी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामधून समोर आलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना नौदल अधिकाऱ्यांच्या स्टंटबाजीमुळे घडली नसल्याचा पैलू समोर आला आहे. नौदलाचे अधिकारी स्टंटबाजी करत असते तर धडक होण्यापूर्वीच सगळ्यांनी स्पीडबोटमधून उड्या टाकल्या असत्या. मात्र, नीलकमल बोटीतील लोकांना वाचवण्यासाठी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घातला, असे हेल्पर निकोशे याने सांगितले. 


आणखी वाचा


नीलकमल बोटीखालून अचानक हात बाहेर आला अन् 14 वा मृतदेह सापडला; 26 तासांनी हंसाराम भाटींचं शव मिळालं