मुंबई : भायखळा महिला कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कारागृह अधिकारी मनिषा पोखरकर आणि पाच महिला गार्ड यांचा समावेश आहे.

अंडी आणि पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सध्या अटकेत असलेले आमदार रमेश कदमही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून उभे राहिले आहेत.

यात त्यांनी इंद्राणी मुखर्जीने केलेल्या आरोपांचा पुनरूच्चार केला आहे. त्यामुळे याप्रकरणात आपलीही साक्ष नोंदवण्यात यावी, असा विनंती अर्ज त्यांच्या वतीने सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. मंजुळा शेट्येला मारहाण झाली तेव्हा आपण जवळच्या कोठडीत होतो, असं रमेश कदम यांचं म्हणणं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप