मुंबई : चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या अवैध बांधकामावर हातोडा चालवण्यात मुंबई महापालिका कारवाई करण्यास धजावत नसल्याचं समोर आहे. मुंबईच्या वर्सोवा परिसरात म्हाडाच्या जमिनीवर अनेक चित्रपट कलाकारांनी अवैधरित्या स्टुडिओ आणि कार्यालयं उभारली आहे. या जमिनीवर म्हाडाला रहिवासी इमारती निर्माण करायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या जमिनीची किंमत हजारो कोटी रुपये आहे. उच्च न्यायालयाने ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिले आहेत, परंतु यानंतरही बीएमसी या अवैध बांधकामाला हात लावण्यास धजावत नाही.
सामान्यांवर कारवाई, सेलिब्रिटींवर मेहरबानी
वर्सोवातील म्हाडाच्या लाखमोलाच्या 40 एकर जमिनीवर अवैध बांधकाम झालं आहे. इथल्याच आरामनगर कॉलनीत मागील 47 वर्षांपासून राहणाऱ्या कामिनी सोनावणे यांनी 30 वर्षांपूर्वी त्यांच्या बंगल्यासमोर 4 फूट उंचीची भिंत बांधली होती. पण ही भिंत अवैध असल्याचं कारण देत महापालिकेनी जानेवारीमध्ये भिंत तोडली. परंतु या बंगल्याच्या शेजारीच 6 फूट उंचीची एक भिंत आहे. मात्र बीएमसीने याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. कारण ही भिंत प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांची आहे.
या परिसरात कैलाश खेर यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. या संपूर्ण परिसरात केवळ रहिवासी इमारत बनवण्याची परवानगी आहे. मात्र इथे कैलाश खेर यांचा स्टुडिओ आहे. फक्त कैलाश खेरच नाही तर अनेक फिल्मी कलाकारांचे आलिशान कार्यलयं आहेत.
वर्सोवामध्ये कोणाकोणाचे बंगले?
I/27 - हा बंगला जावेद जाफरीचा आहे.
I/130 - या बंगल्याचे मालक शक्ति कपूर आहे.
II/186 - हा बंगला अभिनेत्री आएशा जुल्काचा आहे.
इथे 'कोयला' नावाचं रेस्टॉरंट आहे, ज्याची जमीन अभिनेता सोनू सूदची आहे. याशिवाय निर्माता-दिग्दर्शक सुधीर मिश्रा, एस एन मनवानी, नितीन मनवानी, निशीकांत कामत, आय के कपूर, गुड्डु धनुआ और गोविंद नहलानी यासारखे कलाकार इथे राहतात.
इथे राहणाऱ्या काही लोकांनी रहिवासी बंगल्यांना रेस्टॉरंट आणि पबचं रुप दिलं आहे. अवैध बांधकामांनी हा परिसर अक्षरश: झाकून गेला आहे.
साईला चढ्ढा, कैलाश खेरने आरोप फेटाळले!
परंतु अभिनेत्री साईला चढ्ढाने हे आरोप फेटाळले आहेत. म्हाडाकडे माझ्या बंगल्याचा ओरिजिनल ले-आऊट प्लॅनच नाही, ज्यावरुन काय वैध आणि काय अवैध आहे ठरवता येईल, असं साईला म्हणाली.
याबाबत कैलाश खेर म्हणाले की, आरामनगर वर्सोवाचं प्रकरण जुनं आहे. व्यावसायिक कारणांसाठी स्टुडिओचा वापर होत नाही.
म्हाडाची बाजू काय?
वर्सोवाच्या 40 एकर जमिनीवर अवैध ताबा आणि अवैध बाधकामांमुळे म्हाडा त्रस्त आहे. आम्हाला या परिसराचा विकास करायचा असल्याने इथली अवैध बांधकामं पाडणं गरजेचं आहे, असं म्हाडातर्फे सांगण्यात आलं.
म्हाडाने मुंबई महापालिकेला 13 मे 2011 रोजी पत्र लिहून म्हटलं होतं की, "या कॉलनीत अनेकांनी म्हाडाच्या ले-आउटप्लॅनपेक्षा जास्त अवैध काम बांधलं आहे. महापालिकेने अशा भाडेकरुंविरोधात MMC Act आणि MMTP Act अंतर्गत कारवाई करावी."
पण म्हाडाच्या या विनंतीकडे महापालिकेने दुर्लक्ष केलं. चार वर्ष अवैध बांधकामांवर कोणतीही कारवाई न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आपल्या पतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, "अवैध बांधकामावरील कारवाईवर 70 लाखांचा खर्च होईल. हा खर्च जमिनीचा मालकी हक्क असलेल्या म्हाडाला द्यावा लागेल." पण न्यायालयाच्या आदेशावर म्हाडाने बीएमसीला 70 लाख रुपये दिले आहेत, पण महापालिकेने कारवाई केलेली नाही.
महापालिकेच्या या कारभारावर म्हाडाच्या उपाध्यक्षांनी याच महिन्याच्या 7 जून 2016 रोजी मनपा आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. तसंच कारवाई न करणं हा न्यायालयाच्या आदेशाचा अपमान असून त्याचा दंड महापालिकेला बसू शकतो, असा इशाराही दिला होता.
जर या जमिनीचा विकास झाला तर सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळेल. या जमिनीची किंमत हजारो कोटी रुपये आहे. पण व्यावसायिक इमारतींचे मालक आणि महापालिकेचे भ्रष्ट कर्मचारी मिळून हे अवैध बांधकाम तोडत नाही. परिणामी नुकसान सरकारचं आहे.
महापालिकेच्या कारभारवर प्रश्न
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे. मात्र म्हाडाने पैसे दिल्यानंतरही आणि पोलिस संरक्षणानंतरही मनपा या अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास का कचरत आहे?, अखेर बॉलिवूड कलाकारांवर महापालिका एवढी मेहरबान का आहे?, सामान्यांची अवैध बांधकामं तोडणारी बीएमसी फिल्मी कलाकारांविरोधात कारवाई करण्यास का धजावत नाही?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.