मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर बांधलेला कबुतर खाना तोडल्यामुळे भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचा संताप झाला आहे. याच रागातून लोढांनी मुंबई शहर कलेक्टर ऑफिसमध्ये जमिनीवर ठिय्या मांडला आहे.
गिरगाव चौपाटीवर बांधलेल्या अनधिकृत कबुतरखान्यावर हातोडा चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या लोढांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांच्या कार्यालयाबाहेर जमिनीवरच ठाण मांडलं आहे.
गिरगाव चौपाटीचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केल्यामुळे तिथे कोणतंही बांधकाम करण्यात येणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तरीही भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी चौपाटीवर अनधिकृतरित्या कबुतरखाना बांधला.
खरं तर, लोढा यांनी यापूर्वीही गिरगाव चौपाटीवर कबुतरखाना बांधला होता, त्यावेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या तक्रारीवरुन तो तोडण्यात आला होता. मात्र लोढांनी पुन्हा त्याच ठिकाणी कबुतरखाना बांधण्याचा अट्टाहास केला.
अखेर, यावेळीही पालिकेकडून या कबुतरखान्यावर हातोडा चालवण्यात आला. आता या कबुतरखान्यावरुनही शिवसेना आणि भाजपामध्ये तू-तू मैं-मैं रंगणार आहे.