मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. आता मुंबई बँकेतही सत्तांतर होणार असून भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा बँकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 


मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर असलेली सत्ता महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या वेळच्या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँगेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली होती. 


त्यानंतर प्रविण दरेकर यांच्यावर मजूर प्रवर्गातून निवडून आल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.