मुंबई : कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरमधील दोन गर्डरची उंची एकसमान नसल्याचं दिसतंय. त्यामुळे या कनेक्टर संदर्भात समाज माध्यमांमध्ये  काही प्रश्न निर्माण होत आहेत. कनेक्टरमध्ये वापरण्यात येणारे हे दोन गर्डर  बांधकामाच्या वेळी उंचीमध्ये खाली-वर तर झाले नाही ना? अशा प्रकारचे प्रश्न  मुंबईकरांकडून विचारले जात होते. त्यावर प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि अभियंतांनी या सगळ्यामधील संभ्रम दूर केला आहे.


कनेक्टरमधील दोन गर्डरची उंची समान का नाही?


कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी 2 महाकाय बो स्ट्रिंग आर्च गर्डरची जोडणी करण्यात आली आहे. एकाची लांबी 27 मीटर तर दुसऱ्याची 17 मीटर लांब आहे. या महाकाय गर्डरचे वजन पेलण्यासाठी गर्डरच्या खाली एकीकडे 3 मीटर तर दुसरीकडे साडे तीन मीटर उंचीचा आधार देण्यात आला आहे. 


त्यामुळे दोन्ही गर्डरच्या उंचीत साधर्म्य दिसून येत नसल्याचे कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय वांद्रे वरळी सी लिंकला मारिन लाईन्सवरून जाणारा रस्ता या गर्डरवरून वक्र होऊन गेला असल्याने तो दिसताना वर खाली दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ही कुठल्याही प्रकारे चूक नसून योग्य पद्धतीने काम करण्यात आला आहे. रस्ता हा वळणाचा असल्यामुळे येथे सुपर एलेवेशन असणार आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोस्टल रोड पालिकेसाठी महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या जोडणीत कुठेही हयगय केली जाणार नाही, त्यामुळे मुंबईकरांनी भीती बाळगू नये असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.


ही बातमी वाचा :