मुंबई : मुंबईत स्कायवॉक उभारण्याची संकल्पना आल्यानंतर सर्वात प्रथम कलानगर जंक्शन ते वांद्रे स्टेशनला जोडणारा स्कायवॉक उभारण्यात आला होता. सी लिंकपासून-वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे येथील स्कायवॉक तोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
या स्कायवॉकचं तोडकाम आजपासून सुरु होत आहे. या कामासाठी पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. स्कायवॉकची दक्षिणेकडील मार्गिका (सी लिंक दिशेकडील) शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 5 या वेळेत, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री 11 ते सोमवारी पहाटे 5 या वेळेत तोडण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला परवानगी दिली आहे.
नव्या तयार होणाऱ्या कलानगर उड्डाणपुलामुळे कलानगर येथील जंक्शन टाळून थेट संकुलात येणे वाहनचालकांसाठी सोपे होणार आहे. हा उड्डाणपूल 714 मीटर लांबीचा आहे. उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर 2019 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर स्कायवॉकच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्यात येतील.
मात्र, दरम्यान ऐन पावसाळ्यात महापालिका आणि रेल्वेचे 34 पूल बंद आहेत. वांद्रे स्टेशन ते वांद्रे कोर्टला जोडणारा महत्वाचा स्कायवॉकही बंद आहे. त्यातच आता उड्डाणपुलाच्या कामासाठी वांद्रे स्कायवॉकचे दोन भाग तोडण्यात येत आहेत. त्यामुळे, मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागेल.
वांद्रे स्कायवॉक तोडकामादरम्यान वाहतुकीच्या मार्गातील तारखेनुसार बदल
22 जून - पश्चिम द्रुतगती महामार्गावर खेरवाडी पुलापासून कलानगर पुलापर्यंत दक्षिणेकडील वाहतूक शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल
पर्यायी मार्ग - वाकोला पुलाकडून येणारी वाहतूक माहीमकडून पुढे खेरवाडी, खेरवाडी जंक्शन, भास्कर कोर्ट जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन, पुढे धारावी टी जंक्शन अशी जाईल
23 जून - रविवारी रात्री 11 ते ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत माहीम कॉजवे जंक्शनपासून कलानगर पूल फायर ब्रिगेडपर्यंत उत्तरेकडील वाहतूक बंद राहील
पर्यायी मार्ग - माहीम उत्तर दिशेने येणारी वाहने एस. व्ही. रोडवरून पुढे जातील. सी लिंककडून येणारी वाहने पश्चिम द्रुतगती महार्गावर वांद्रे रिक्लेमेशन येथे डावे वळण घेतील आणि एस.व्ही. रोडवरून पुढे जातील